गदर 2 सिनेमाच्या मोठ्या यशानंतर आता अभिनेता सनी देओलने त्याच्या पुढच्या काही सिनेमांवर काम करायला सुरुवात केली आहे. सध्या सनी त्याच्या एका सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर शुटिंगच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला असून, या सिनेमाविषयी माहिती समोर आली आहे. बॉलीवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल त्याच्या आगामी ‘सूर्या’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे. तो याच सिनेमाच्या शुटिंगच्या दरम्यानचा आहे. या फोटोत सनी देओल आणि प्रज्ञा जयस्वाल पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. एम. पद्मकुमार दिग्दर्शित हा सिनेमा मल्याळम सुपरहिट जोसेफ या सिनेमाचा हिंदी रिमेक असणार आहे. कमल मुकुट यांच्या एमएम मूव्हीज बॅनरखाली हा सिनेमा तयार केला जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोत सनी देओल आणि प्रज्ञा जयस्वाल याच सिनेमातील एक सीन शूट करत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चाहते तिथे आले होते. त्यामुळे काही वेळ शूटिंग थांबवून चाहत्यांना दोन्ही कलाकारांनी प्रतिसाद दिला. एका वृत्तानुसार, प्रज्ञा या सिनेमा एक भावनिक आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा साकारत आहे, जी कथेच्या भावनिक गाभ्याचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल हिने खेल खेल में आणि डाकू महाराज यांसारख्या सिनेमात काम केले आहे. आता ती सनी देओलसोबत लीड रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सिनेमाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली आहे. सूर्या हा एक थ्रिलर सिनेमा असणार आहे. सिनेमाचे शुटिंग राजस्थानमध्ये सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस थिएटरमध्ये ‘सूर्या’ प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे, निर्माते लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे. हेही वाचा : सारा खान आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोल; व्हिडिओ शेअर करत दिले सडेतोड उत्तर