‘प्रिय स्वामी, माझ्यासाठी काहीही मागणार नाही; पण…’, पूजा सावंतने थेट देवालाच लिहिले पत्र

Actress Pooja Sawant Viral Post: पूजा सावंत मराठी सिनेइंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्यावर्षी तिने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या मराठी व्यक्तीशी लग्न केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत असे दौरे करत पूजा काम व वैवाहिक आयुष्यात समतोल साधत आहे. पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या चाहत्यांशी कनेक्ट असते. नुकताच तिने शेअर केलेला एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हीडिओमध्ये पूजा देवाला पत्र लिहिताना दिसत आहे. या पत्रातून अभिनेत्रीने प्राण्यांप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, मुक्या प्राण्याला मदत करेल ही बुद्धी जगातील सगळ्यांना द्या, अशी विनंतीही तिने देवाला केली आहे.
View this post on Instagram
या पत्रात अभिनेत्री पूजा सावंतने लिहिले की, प्रिय स्वामी, परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, देवाकडे फेसबुक नाही, इन्स्टाग्राम नाही, पण स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर! खरंच किती दिवस झाले ना पत्र लिहून…म्हणून म्हटलं आज थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. पण, तुमच्या दत्त अवतारात जे पायाशी चौघे उभे आहेत ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी मागणार आहे.
स्वामी, या जगात कोणताही मुका प्राणी जेव्हा संकटात असेल, तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुक्या प्राण्याला मदत करेल. ही बुद्धी जगातील सर्वांना द्या. तसेच मला एवढं सक्षम करा की, मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. सध्या माझा पत्ता बदललाय. पण, मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरी, मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडला आहे., अशा शब्दांमध्ये तिने देवाकडे पत्राच्या माध्यमातून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.


