अभिनेत्री दिपा परबला मिळाली मोठी संधी; ‘बाईपण भारी’ चित्रपटानंतर आता थेट बॅालीवूडमध्ये एन्ट्री

Deepa Parab : अशा अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीत आपल्या कामाचा ठसा उमटला आहे. याशिवाय हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये आपली अभिनयाची छाप सोडली. तसेच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री दीपा परब ही त्यापैकीच एक. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या बळावर रसिकांचे लक्ष वेधले. आता दीपा परबला एक मोठी संधी मिळाली असून ती एका हिंदी चित्रपटात लीड रोलमध्ये झळकणार आहे.
फकिरीयत या आगामी हिंदी चित्रपटात अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून संतोष मांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपी च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. एका प्रदीर्घ ब्रेकनंतर अभिनेत्री दीपा परब पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात कम बॅक करणार आहे.
फकिरीयत हा चित्रपट महावतार बाबाजी व त्यांचा क्रियायोग यांची खरी ओळख सांगणारा आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर लिखित पुस्तकांवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात दीपा परब, विनीत शर्मा, संतोष जुवेकर, उदय टिकेकर, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनिशा सबनीस आदी कलाकरांच्या महत्वाच्या भूमिका असणार आहेत. अभिनेत्री दीपा परब ही शेवटची तू चालं पुढे या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत दिसली होती. याशिवाय बाईपण भारी देवा या चित्रपटात तिने काम केले आहे.
हेही वाचा : रेल्वे प्रवाशांची चिंता मिटणार! वेटिंग तिकिटे आता लवकर कन्फर्म होणार…





