Ranya Rao : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली सोमवारी रात्री बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती दुबईहून भारतात परतत असताना अधिकाऱ्यांनी तिला 14.8 किलो सोन्यासह पकडले. तिला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने अटक केली. अटकेनंतर तिला दुसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सध्या तिची चौकशी सुरु आहे. दुबईहून बेंगळुरूला येणा-या एमिरेट्सच्या विमानातून रान्या रावला लँड होताच अटक करण्यात आली. अवघ्या 15 दिवसांत ती चार वेळा दुबईला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर संशय अधिक गडद होऊ लागला. त्यानंतर तिच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. सोन्याच्या तस्करीत रान्या रावचा हात असल्याची माहिती डीआरआयला आधीच मिळाली होती, असेही काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. त्यामुळे तिच्या अटकेसाठी पथकाने विमानतळावर आधीच व्यवस्था केली होती. सायंकाळी 7 वाजता त्यांचे विमान उतरताच तिला ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीदरम्यान अभिनेत्रीने १७ सोन्याचे कॉईन असल्याचे आणि तिच्या परदेश दौऱ्यांची कबुली दिली आहे. दुबईहून १४.८ किलोची १७ सोन्याची बिस्किटे तस्करी केल्याचे आरोप पोलिसांनी केले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या रान्या रावने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्याकडे १७ बिस्किटे असल्याचे कबूल केले आहे. रान्या राव ही वारंवार दुबईवारी करत असल्यामुळे ‘डीआरआय’चे अधिकारी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. सोमवारी रात्री अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले. ही अभिनेत्री कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असल्याचंही समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. तसंच काही धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. पोलिसांना दिलेल्या जबाबात अभिनेत्रीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पोलिस जबाबात रान्या राव म्हणाली की, “मी युरोप, अमेरिका आणि अरब देशांमध्ये प्रवास केला आहे. मी सांगू इच्छिते की, सध्या मी प्रवासामुळे फार थकलेली आहे. कारण मी व्यवस्थित आराम केलेला नाही. ” शिवाय, कर्नाटकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असल्याची बतावणी करणाऱ्या राण्या राव हिने स्वत:ची खरी ओळखही सांगितलीये. ती रियल इस्टेट व्यावसायिक के.एस. हेगदेश यांची मुलगी आहे. अभिनेत्रीचा पती जतीन हुक्केरी असून तो पेशाने आर्किटेक आहे. अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की, तिची निष्पक्ष सुनावणी केली जात आहे. शिवाय तिने पोलिसांना जी काही तिने माहिती दिली आहे, ती कोणाच्याही दबावाखाली दिलेली नाही. राण्या राव म्हणाली की, तुरुंगात असताना तिला जेवण करण्यास सांगितले गेले होते, पण भूक नसल्याने तिने जेवण्यास नकार दिला होता. असं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे. तस्करी कशी केली? रान्या राव अतिशय हुशारीने भारतात सोने आणत होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिने काही भाग दागिने म्हणून परिधान केले होते. तर उरलेले सोने तिने कपड्यात लपवून आणले होते. प्राथमिक तपासात असाही संशय व्यक्त केला जात आहे की, रान्या राव यांनी आपल्या उच्चपदस्थतेचा फायदा घेत सीमाशुल्क तपासणीला बगल दिली होती. मात्र, तिच्या अटकेनंतर हे संपूर्ण नेटवर्क आता तपासात पुढे आले आहे. बिझनेस ट्रिपचे निमित्त दिले : अधिकाऱ्यांनी रान्याची चौकशी केली असता, ती केवळ व्यवसायासाठी दुबईला जात असल्याचा दावा तिने केला. मात्र १४.८ किलो सोन्याच्या जप्तीने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २०१४ मध्ये पदार्पण केले : रान्या रावने २०१४ मध्ये ‘माणिक्य’ या कन्नड चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात सुदीप मुख्य भूमिकेत होता आणि त्याचे दिग्दर्शनही केले होते. कन्नड चित्रपटांनंतर, अभिनेत्रीने २०१६ मध्ये ‘वगाह’ या तमिळ चित्रपटाद्वारे पदार्पण केले. ज्यामध्ये ती विक्रम प्रभूसोबत दिसली होती. आता पुढे काय? डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या तस्करीच्या जाळ्यात रान्या राव एकटीच होती की? हे संपूर्ण रॅकेट चालवणारी मोठी टोळी होती का? याचा शोध घेतला जात आहे. त्याच्या वारंवार दुबईला येण्यामागचे खरे कारणही तपासले जात आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर रान्या राव यांना कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.