‘शेर हमेशा शेर ही रहता है…’, तमिळ अभिनेता विजय म्हणाला – द्रमुक-भाजपासोबत युती करणार नाही

Tamilaga Vettri Kazhagam: तमिळगा व्हेट्री कळगम (टीव्हीके) या पक्षाचे संस्थापक आणि अभिनेत्याच्या भूमिकेतून राजकारणात आलेले सी. जोसेफ विजय यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष डीएमके विरोधात थेट लढत देणार असल्याचे जाहीर केले. मदुरै येथे आयोजित टीव्हीकेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत हजारो समर्थकांनी हजेरी लावली होती. या परिषदेत विजय यांनी डीएमकेला एकमेव “राजकीय शत्रू” आणि भाजपला “वैचारिक शत्रू” संबोधत कोणत्याही पक्षाशी युती करण्याची शक्यता फेटाळून लावली.
सर्व २३४ जागांवर लढणार टीव्हीकेविजय यांनी सभेत स्फूर्तिदायी भाषणात म्हटले, “सिंह एकदा गरजला की त्याचा आवाज आठ किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. जंगलात कितीही कोल्हे असले तरी सिंह एकच असतो, तोच जंगलाचा राजा आहे. सिंह नेहमी सिंहच राहतो.” त्यांनी आपला पक्ष तमिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. “मला कोणत्याही गुलाम युतीत सामील होण्याची गरज नाही. आमची युती स्वाभिमानी असेल, स्वार्थी नव्हे,” असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री स्टालिन यांच्यावर टीका –
विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. डीएमके सरकारने महिला, सरकारी कर्मचारी आणि इतर समाजघटकांना फसवल्याचा आरोप त्यांनी केला. पक्ष कार्यकर्त्यांना २०२६ च्या निवडणुकीत डीएमके सरकारला उखडून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजप आणि AIADMK वरही निशाणा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तमिळनाडूच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विजय यांनी तमिळ जनता भाजपशी जोडली जाणार नाही, असे ठणकावून सांगितले. तसेच, एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या निधनानंतर प्रथमच त्यांनी AIADMK च्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पक्षाची टीका केली.
नव्या राजकीय इतिहासाची निर्मिती –
विजय यांनी दावा केला की, २०२६ च्या निवडणुकीत टीव्हीके तमिळनाडूच्या राजकीय इतिहासात नवे पर्व लिहील. १९६७ आणि १९७७ च्या निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांना मिळालेले यश पुन्हा प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





