Actor Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, लगेच मिळाली मोठी जबाबदारी

Actor Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.
सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक – अजित पवार
अजित पवार म्हणाले, “मी चित्रपट पाहत नाही पण सयाजीराव यांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कामात त्यांची माझी भेट झाली. मुळात सयाजीरावांना झाडाची आवड आहे. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचं मोठं काम आहे. साईबाबांचा प्रसाद, सिद्धीविनायक बाप्पाचा प्रसाद दिला जातो तसा प्रसाद म्हणून रोपटं दिलं जावं असं आम्हाला त्यांनी सांगितलं. अशा विषयावर चर्चा करत असतो. सयाजीराव राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील”, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.





