‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अभिनेता आर.माधवनची निवड

नवी दिल्ली – अभिनेता आर माधवन यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माधवन याचे नाव जाहीर करताना त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच माधवन यांच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी ठाकूर म्हणाले, “एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की, तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल.’ यापूर्वी आर माधवन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये उपस्थित होते. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.





