अभिनेते मिलिंद गवळी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नव्या मालिकेत होणार एन्ट्री

Milind Gawali | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. या मालिकेतील अनिरुद्ध देशमुख अर्थात अभिनेते मिलिंद गवळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत माजी समाजकल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंची भूमिका ते साकारणार आहेत. मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. यातच आता यशवंतराव भोंसलेंची यात एन्ट्री होणार आहे.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले, “साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय. अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाही. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. यशवंतराव भोसलेंच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे.”
“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो आहोत. कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे. जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळतेय याचा आनंद वेगळा आहे. याशिवाय ‘स्टार प्रवाह’बरोबर एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे,” असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेची मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत झळकली होती.
हेही वाचा:




