अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने ICU मध्ये दाखल

मुंबई : सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असणारे अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर ते आय.सी. युमध्ये दाखल आहेत. किरण माने यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
काय लिहिले पोस्टमध्ये?
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसत खेळत होतो. आज आय.सी.यू, सलाईन, इंजेक्शन, गोळ्या तपासण्या आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नाॅट. किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.
अनेक राजकीय, सामाजिक त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रसंगांवर किरण माने हा त्यांच्या सोशल मीडियावरुन भाष्य करत असतात. अनेक मुद्दे ते यातून मांडत असतात. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर किरण माने हे बिग बॉसच्या घरात दिसले होते. तसेच त्यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश करून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.






