अजित पवारांना कार्यकर्त्यांनी दिली खास भेटवस्तू; पण पाटीवर लिहिलेला ‘तो’ शब्दच झाकला

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावरून वारंवार चर्चा रंगली आहे. सत्ताधारी आणि विरोधक या मुद्दयावरून एकमेकांना आव्हान देताना दिसतात. दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि नावाची एक खास पाटी भेट म्हणून दिली. मात्र ही पाटी हातात घेताच त्यांनी शालेने झाकली. कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना दिलेल्या पाटीवर ‘मा. ना. अजित आशाताई अनंतराव पवार’ असं पहिल्या ओळीत लिहिलेलं होतं.
तर दुसऱ्या ओळीमध्ये, ‘मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य’ असे शब्द लिहिले होते. सोनेरी अक्षरांमध्ये मजकूर लिहिलेली ही काळ्या रंगातील काचेची पाटी अजित पवारांनी स्वीकारली. मात्र फोटो काढताना अजित पवारांनी या पाटीवरील ‘मुख्यमंत्री’ हा शब्द गळ्यातील भगव्या शालीने झाकून घेतलं. त्यानंतर काही समर्थक अजित पवारांनी नाव झाकलेलं कापड बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अजित पवारांनी, ‘आपण मॅजिकल फिगर जी म्हणतो 145’ असं म्हणत जो बहुमताचा आकडा गाठतो तो मुख्यमंत्री होतो असं सूचित केले. Ajit Pawar |
सुनेत्रा पवार यांनाही दिली होती अशी भेटवस्तू
यापूर्वी काही जणांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून बारामतीमधून लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांना ‘सुनेत्रा अजित पवार, खासदार, बारामती’ अशी पाटी भेट देिली होती. मात्र सुनेत्रा यांचा सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. Ajit Pawar |
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील पाच वर्षामध्ये तिन्ही सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री झाले. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्याच नावावर आहे. तसेच अजित पवार यांनी स्वत: अनेकदा मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलूनही दाखवली होती. Ajit Pawar |
हेही वाचा :
युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक ; म्हणाले,”माझी खात्री आहे की बारामतीची जनता..”





