प्रभात वृत्तसेवा राहू ( भाऊ ठाकूर ) – पूर्ण राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा ज्वर तापू लागला आहे. त्याच प्रमाणे दौंड तालूक्यातील राहू बेटातही विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयारी चालवली आहे. मात्र,परंतु बेट परिसरात दोन्ही बाजूकडील नेते कार्यकर्त्यांना कोणताच सिग्नल देत नसल्याने करावे तरी काय, हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे.राहू जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण सर्वसाधारण असल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात अनेक हौसे नवसे देखील दिसून येत आहेत. परंतु वरिष्ठ पातळीवरील नेते मात्र ताकास तूर लागू देईनात. राहू जिल्हा परिषद गटात पूर्ण राहू बेट परिसर येतो.त्या मुळे राहू व खामगाव गणात (गावात)जास्त इच्छुक आहेत. कारण ही दोन्ही गणांची गावे मोठी लोकसंख्या असलेली आहेत. परंतु गटात व दोन्ही गणात सध्या वादळापूर्वीची शांतता पाहायला मिळत आहे.त्यातही नगरपरिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू असल्यामुळे गटात व गणात सध्या शांतता दिसून येत आहे. आमदार बालेकिल्ला राखणार! राहू जिल्हा परिषद गट हा विद्यमान आमदारांचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणुकात राहू जिल्हा परिषद गट व राहू गणावर आमदारांचे वर्चस्व होते. परंतु आता गट रचना बदलल्यामुळे विद्यमान आमदार हे गटावर व दोन्ही गणावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्या मुळे योग्य वेळी योग्य उमेदवार देऊन बाकीच्या गोष्टीला फाटा देऊन गट व दोन्ही गण जिंकण्याच्या मानसिकतेत आहेत. थोरात सावध पावले उचलणार… मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राहू गटातील खामगाव गणांची जागा माजी आमदार रमेश थोरात यांनी जिंकली होती. तर, राहू गट व गण हे काही थोडक्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.परंतु आता बदललेल्या गट रचनेच्या माध्यमातून योग्य उमेदवार देऊन मागील निवडणुकात झालेला पराभव धुवून काढण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यासाठी अभ्यास करून व सावध पावले टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. नेता केंद्रित निवडणुकीला प्राधान्य.. दोन्ही विरोधी वरिष्ठ नेत्यांनी समोर कोणता उमेदवार दिला जाईल, त्यावर उमेदवार जाहीर करण्याचे तंत्र अवलंबले आहे. परंतु या मुळे दोन्ही गटातील उमेदवारांना मतदारांसमोर जाण्यास वेळ मिळणार नाही. मग ऐन वेळी नेत्यांना संपर्कावर अवलंबून रहावे लागते. त्या मुळे उमेदवाराचा खरा कस लागत नाही. म्हणजेच ही निवडणूक ही कार्यकर्ता केंद्रित नाही तर नेता केंद्रित होते व ते लोकशाहीला घातक आहे.