पुणे -कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. धंगेकर यांच्या विजयामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे यांची शिवसेना यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय धंगेकर यांना त्यांच्या दुचाकीचीही मोठी साथ लाभली आहे, त्यांच्या या दुचाकीचीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. कोणाला मदत हवी असेल किंवा कोणी कधीही हाक दिली की रविंद्र धंगेकर हे आपल्या ऍक्टिवाला किक मारून तत्काळ तेथे हजर व्हायचे, हिच ऍक्टिवा पळवित त्यांनी अनेकांना वेळेत मदत केली. नागरिकांच्या मदतीसाठी वेळोवेळी धावलेली हिच ऍक्टिवा धंगेकर यांच्यासाठी निवडणुकीतही विजयासाठी “धावून’ आली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला, त्यांच्या या विजयाची चर्चा असताना धंगेकर यांच्या दुचाकीचीही चर्चा होत आहे. धंगेकर हे नेहमी अनेकांना ऍक्टिवावर प्रवास करताना दिसतात, त्यांचे घर ते महापालिका कार्यालय हा रोजचा प्रवासही ते ऍक्टिवावरून करतात. अनेकांच्या भेटीगाठी, मतदारांशी संपर्क ठेवण्यातही त्यांनी हिच ऍक्टिवा वापरली आहे, त्याचमुळे त्यांच्या विजयानंतर अनेकांनी त्यांच्या दुचाकीसोबत फोटो काढले. प्रचारासाठीही त्यांनी ऍक्टिवाचा उपयोग केला, त्या कारणातून त्यांची सामन्यांचा कार्यकर्ता, अशी ओळख झाली. हीच ओळख त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.