मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी स्वत: पुणे पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही सरकारच्या वतीने दिलेल्या आहेत. आरोपीचे सर्व लागेबांधे पोलिसांच्या हाती आलेले आहेत. त्याला कुठल्याही परिस्थिती तत्काळ अटक केली होईल. अशाप्रकारचे नराधम आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करत असतील, तर त्यांची गय केली जाणार नाही, सोडले जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याचे सरकारचे धोरण आणि भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. बंद पडलेल्या बस निकाली काढण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. ज्या बस आगारात बंद पडलेल्या बसमध्ये होणारे गैरप्रकार पूर्णपणे बंद झाले पाहिजेत. अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या तत्काळ निकाली काढाव्यात. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारीला वाव मिळता कामा नये, अशा सूचना सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत. परिवहन मंत्र्यांनी काल सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. एसटी महामंडळ प्रशासन आणि सरकारच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.