पालिकेचा परवाना; शहरातील 70 टक्के स्टॉल भाडेतत्त्वावर
पुणे – महापालिकेतर्फे परवानगी देण्यात आलेल्या स्टॉलमध्ये पोट भाडेकरू ठेवण्याचे प्रमाण वाढले असून आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शहरात महापालिकेने सुमारे 13 हजार स्टॉल्सना परवानगी दिली आहे. त्यातील सुमारे 70 टक्के परवानाधारकांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. याआधीही महापालिकेने तपासणी मोहीम सुरू केली होती. मात्र, लॉकडाऊन झाल्यानंतर ही कारवाई थांबली.
मात्र, आता ही कारवाई वेगाने सुरू करण्यात येणार आहे. ज्या नावाने परवाना दिला आहे, त्यालाच स्टॉलवर व्यवसाय करता येतो. मात्र, तसे न होता अनेकांनी तो पोटभाडेकरूस दिला आहे. त्यामुळे जे इमाने इतबारे व्यवसाय करतात त्यांच्यावर अन्याय होत आहे.
तुळशीबागेत प्रमाण अधिक…
महापालिकेने स्टॉलधारकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून 70 टक्के परवानाधारकांनी पोटभाडेकरू ठेवल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये मुख्य पेठांचा विशेषत: तुळशीबाग परिसराचा समावेश आहे. प्रत्येक स्टॉलला अक्षरश: हजारो, लाखोने भाडे घेतले जात असून स्टॉलमध्ये वरकमाईचे साधन केल्याचे निदर्शनास आले आहे.