पिंपरी | निकृष्ट रस्ताप्रकरणी ठेकेदार व पालिका अधिकार्यांवर कारवाई होणार

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची देयके काढून केलेल्या गैरव्यवहारातील दोषी ठेकेदारकडून वसुली करून दोषी ठेकेदार, महापालिका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात आज (दि.9) केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज (दि.9) आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जानेवारी 2022- 23 कोट्यवधी रुपयाच्या डांबरी व सिमेंट काँक्रीटकरणाची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या 44 तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्या.
त्यामुळे या रस्त्यांच्या कामाच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी करणेबाबत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांच्यामार्फत करून या कामातील दोषी ठेकेदार व निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणारे संपूर्ण देयेके देणार्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याबाबत सभागृहात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
याला लेखी उत्तरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत निविदा दराच्या 40 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी दराने स्वीकृत करण्यात आलेल्या निविदांपैकी 15 रस्त्यांच्या कामांचे गुणवत्ता व दर्जा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ह्या त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात येऊन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे यांनी दिलेले अहवालामध्ये काही रस्त्यांची गुणवत्तामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
त्यामुळे या रस्त्यांची कामांची ठेकेदारांकडून दुरुस्ती व रक्कम वसूल करून याबाबत सीओईपीने दिलेल्या अहवालातील शिफारशीनुसार निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची कामे केलेल्या दोषी ठेकेदारांकडून रकमेची वसुली व संबंधित रस्त्यांचे कामावर देखभाल करणार्या महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासित केले.
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील रस्त्याच्या कामामध्ये मागील दोन-तीन वर्षापासून सातत्याने महापालिका अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाला या कारवाईने लगाम लागण्याची शक्यता आहे. महापालिकेतील अधिकारी राजकीय दबाव झिडकारून करदात्या नागरिकांच्या पैशातून शहरात विकास कामे करताना शहराचे हित जोपासण्याचे काम करतील अशी आशा व्यक्त करत आमदार अश्विनी जगताप यांनीमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.





