मुंबई – अवैधरित्या डिझेलची खरेदी/विक्री करणाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत राज्यस्तरीय दक्षता पथकामार्फत १२,४९,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख यांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवर आमगाव येथील हॉटेल अरोमा समोरील मोकळ्या जागेत अवैधरित्या डिझेलची खरेदी व साठवणूक करुन तेथूनच त्याची विक्री करीत असल्याच्या माहीती मिळाली होती. माहीतीनुसार, राज्यस्तरीय दक्षता पथकामार्फत 12 नोव्हेंबरला कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये घटनास्थळी डिझेल सदृश पेट्रोलियम द्रव्य पदार्थाचा 5360 लीटर्स साठा, मोटार व इतर वस्तू या प्रमाणे 12,49,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत राज्यस्तरीय दक्षता पथकाने घटनास्थळी केलेल्या पाहणीत इंधन टाकीमध्ये प्लास्टीक कॅनमधून इंधन भरत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी पथकाने, वाहन मालक सत्तर मजिद सालियावाला, परेश अमृतभाई जोशी व आयुष भरतभाई जोशी अशा तीन जणांना पकडले आहे. या व्यवसायाबाबत त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे व परवाने नसल्याचे त्यांनी सांगितले.