पिंपरी – शहरातील हवेची गुणवत्ता खालावण्यास रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कारवाई हाती घेतली आहे. उपद्रव शोधपथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील १३ आरएमसी प्रकल्पांची तपासणी करत ते बंद (सील) केले. वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केलेल्या ३० प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत आरएमसी प्रकल्पांची संख्या सातत्याने वाढत आहे. प्रदूषण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील तीस प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या व तक्रारींचे तत्काळ निरसन करण्यासाठी महापालिकेने दोन उपद्रव शोधपथकांची नेमणूक केलेली आहे. या पथकांनी ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील आरएमसी प्रकल्पांची तपासणी केली. यामध्ये १३ आरएमसी प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेली वॉटर स्प्रकिंलिंग सिस्टीम नसणे, मिक्सिग ऑपरेशन्स खुल्या जागेत, खडी, वाळू व क्रश सँड वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा वापर न करणे अशा बाबी आढळून आल्या. या प्रकल्पांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तत्काळ कारवाई करत प्रकल्प बंद करण्यात आले. ‘पर्यावरणाच्या अनुषंगाने असलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके कार्यान्वित केली आहेत. ज्या प्रकल्पाच्या ठिकाणी वायुप्रदूषण नियंत्रणप्रणाली किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.’- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका