Wagholi News : पेरणे फाटा येथील बेकायदेशीर आधार केंद्रावर कारवाई

वाघोली : पेरणे फाटा येथे अनधिकृत आधार केंद्रात कागदपत्रांमध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीने कामे सुरु असल्याबाबत पाहणी करून पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईची मागणी केल्यानंतर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केंद्रावर धाड टाकली. यावेळी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सरपंचांनी केलेल्या लेखी तक्रारीत म्हंटले आहे की, ग्रामपंचायत पेरणे हद्दीमध्ये पेरणे फाटा येथे मुख्य चौकात ‘श्री राज सायबर कॅफे’ या नावाने अनाधिकृतपणे आधार केंद्र सुरु असून सदर केंद्रास ग्रामपंचायतीकडून कोणतीही कायदेशीर परवानगी अथवा शासनमान्य आधार केंद्र नाही. आधार केंद्रातुन कागदपत्रांमध्ये फेरफार करुन चुकीच्या पध्दतीने काम सुरु असल्याचे ग्रामस्थांनी केलेली तक्रारीच्या अनुषंगाने पाहणी केली असता आमच्या निदर्शनास सदर बाब आली असून सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.
पेरणे फाटा परिसर हा जयस्तंभ लगत असल्याने संवेदनशील आहे. तसेच औद्योगिक व नागरिकरणाच्या दृष्टीने विविध राज्यासह जिल्हयातील नागरिक या ठिकाणी रहिवाशी आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यासह देशात बांगलादेशी नगरिक आढळून आलेले आहेत असे वृत्तपत्रातील प्रसिध्द बातमी व वृत्तवाहिनीवरुन समजले आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सुरु असलेल्या आधार केंद्रावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदारांनी याठिकाणी धाड टाकून तेथील मशीन, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे व याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. पेरणेफाटा येथील शिवभोजन थाळी केंद्रावरही तहसीलदारांनी धाक टाकून तपासणी केली असता याठिकाणी खाजगी मेसचा फलक लावण्यात आला आहे तसेच शासकीय रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याचे आढळून आले.





