प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 – शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांना जबाबदार धरत महापालिकेने अखेर ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन वर्षांत तयार करण्यात आलेल्या तसेच दोष दायित्व कालावधी (डीएलपी) असलेल्या ज्या ठेकेदारांचे रस्ते खराब झाले आहेत, अथवा त्यावर खड्डे पडले आहेत, अशा ठेकेदारांकडून गुरुवारी दिवसभरात पालिकेने प्रती खड्डा पाच हजार रुपयांप्रमाणे 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली.
शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर उशिरा का होईना; पण जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाकडून शहरात खड्डे दुरुस्ती सोबतच ठेकेदारांना खड्ड्यांसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने गेल्या 3 वर्षांत शहरात डांबरीकरण तसेच रिसर्फेसिंग केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्यास ठेकेदारांवर कारवाई निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी या सर्व रस्त्यांची तपासणी करण्यात येत असून, त्या सोबतच ज्या रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांत काम केले आहे आणि खड्डे पडले आहेत,
अशा रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार धरत त्यांच्याकडून 1 चौरस मीटर पर्यंतच्या खड्ड्यांना प्रती खड्डा 5 हजारांचा दंड निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार पथ विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून ठेकेदारांवर दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात धायरी काळूबाई मंदिर परिसर आणि कात्रज येथील नॅन्सी लेकटाऊन परिसर ते पद्मजा पार्क परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी 1 लाख 30 हजार, पर्वती पायथा परिसरातील खड्ड्यांसाठी 25 हजार, महंमदवाडी येथील महापालिका शाळेच्या परिसरातील खड्ड्यांप्रकरणी 2 लाख 30 हजार हरे कृष्णपथ अणि सूस-म्हाळूंगे रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी अनुक्रमे 75 आणि 40 हजार असा पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ठेकेदारांची नावे जाहीर करा
महापालिकेकडून शहरातील दोष दायित्व कालावधी असलेल्या तसेच ज्या ठेकेदारांकडून दंड आकारणी करण्यात आली आहे, त्यांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांमुळे नागरिकांच्या जीवावर बेतले असताना या ठेकेदारांवर कारवाई तर करावीच मात्र, त्यांना ब्लॅकलिस्टेड करावे, अशी मागणी केली जात आहे.