आळंदीत अवैध पार्किंगविरोधी कारवाई: पर्यायी जागेअभावी नागरिक हैराण, देहू फाट्यावर तणावपूर्ण प्रसंग

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी, देहू फाटा परिसरात अवैध पार्किंग केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. अनेक वाहने टोईंग व्हॅनद्वारे उचलून जप्त केली जात आहेत. मात्र, वाहन पार्किंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने आणि सम-विषम तारखांचे फलक नसल्याने नागरिकांपुढे वाहने कुठे लावायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देहू फाट्यावर तणावपूर्ण प्रसंग –
गुरुवारी देहू फाट्याजवळील काळे कॉलनीसमोर वाहतूक पोलिसांनी अवैध पार्किंगविरोधी मोहीम राबवली. रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी टोईंग व्हॅनद्वारे उचलल्या जात होत्या. यावेळी एका दुचाकी मालकाने थेट टोईंग व्हॅनसमोर रस्त्यावर आडवे झोपून निषेध नोंदवला. पोलिसांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठण्यास तयार नव्हता. यामुळे काही वेळ पोलिस आणि त्याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी पर्यायी पार्किंगची जागा उपलब्ध करावी आणि सम-विषम तारखांचे फलक लावावेत, तोपर्यंत कारवाई थांबवावी, अशी मागणी केली. अखेरीस पोलिसांनी त्या व्यक्तीची समजूत काढली, दंड वसूल करून त्याची दुचाकी त्याच्या ताब्यात दिली.
भाविकांची गैरसोय –
आळंदीत वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. वाहन जप्त झाल्यास ते सोडवण्यासाठी ५०० ते ७०० रुपये दंड भरावा लागत आहे. विशेष म्हणजे, माउली मंदिर परिसरात पर्यायी पार्किंग जागेबाबत कोणतेही सूचनाफलक नाहीत. यामुळे माउली दर्शनासाठी दूरवरून येणारे भाविक मंदिर परिसरात उपलब्ध जागेत वाहने उभी करतात. मात्र, १५ ते २० मिनिटांतच वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होते. दर्शनानंतर परत आल्यावर वाहन न दिसल्याने भाविक चिंतेत पडतात. चौकशीअंती त्यांना कळते की, त्यांच्या वाहनांवर नो-पार्किंग कारवाई झाली आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण –
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक (वाहतूक विभाग, आळंदी) सतीश नांदुरकर म्हणाले, “सदर व्यक्तीची मोटरसायकल नो-पार्किंग झोनमध्ये असल्याने टोईंग कारवाई करण्यात आली. तो दंड भरण्यास तयार नव्हता आणि त्याने मद्यपान केले होते. कारवाई टाळण्यासाठी तो टोईंग व्हॅनसमोर रस्त्यावर झोपला. त्याला समजावल्यानंतर त्याने दंड भरला आणि मोटरसायकल घेऊन गेला.”
नागरिकांची मागणी –
आळंदी आणि देहू फाटा परिसरात वाहन पार्किंगसाठी पर्यायी जागा आणि सम-विषम तारखांचे फलक लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जोपर्यंत याबाबत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत अशा कारवाया नागरिक आणि भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहेत.





