PMRDA: दिरंगाई केल्यास ठेकेदारावर कारवाई; पीएमआरडी आयुक्तांचा इशारा
PMRDA: ‘चाकण डी-क्लॉग वर्क’ अंतर्गत रस्त्याच्या कामाची पाहणी

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून चाकणमधील उद्योगांच्या स्थलांतरांचा विषय चर्चेत आहे. याची सरकारने गांभिर्याने दखल घेतली आहे. थेट मंत्र्यांनी औद्योगिक परिसरात येऊन पाहणी केली. यामुळे विविध समस्यांनी ग्रासलेल्या औद्योगिक परिसराकडे अखेर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे देखील लक्ष गेले आहे.
चाकणला सर्वाधिक भेडसावणारी समस्या वाहतूक कोंडी असून ही कोंडी फोडण्यासाठी ‘चाकण डी-क्लॉग वर्क’अंतर्गत सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या सात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व संबंधित अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी केली. तसेच कामात दिरंगाई झाल्यास कडक कारवाईचा इशारा ठेकेदाराला देण्यात आला आहे. संबंधित कामांचे कार्यादेश फेब्रुवारी २०२६ मध्ये देण्यात आले असून एका वर्षात ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून सुरू असलेल्या ‘चाकण डी-क्लॉग वर्क’अंतर्गत सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या सात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांची सोमवारी (दि. १७) प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करण्यात आली.
चाकण परिसरातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे आणि प्रलंबित कामांचा आढावा घेताना संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
चऱ्होली खुर्द ते आळंदी या सुमारे दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम, पुणे-नाशिक रस्ता ते आळंदी फाटा आणि पुढे आळंदीपर्यंतच्या रस्त्यांची सुधारणा, कुरुळी फाटा ते निघोजे या अडीच किलोमीटरच्या मार्गाचे काम, तसेच खालुंब्रे ते एमआयडीसी फेज-२ या रस्त्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मौजे चिखली ते मोई मार्गावरील रुंदीकरणाचे कामही सुरू करण्यात येत आहे.
कुरुळी फाटा ते निघोजे मार्गावरील सात मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम १५ दिवसांच्या नियोजनानुसार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच महावितरणचे अडथळा ठरणारे खांब हलविणे, नाल्यालगत सुरक्षितता उपाययोजना करणे आणि एमआयडीसीतील मर्सिडीज चौक परिसरातील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
– योजनेचे नाव : चाकण डी-क्लॉग वर्क
– उद्दिष्ट : चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडी कमी करून प्रवासाचा वेळ वाचवणे आणि वाहतूक सुरळीत करणे.
– रस्त्यांची लांबी : सुमारे १७ किलोमीटर; सात रस्त्यांचा समावेश.
– प्रशासकीय मान्यता : १००.१४ कोटी रुपये.
– देखभाल-दुरुस्ती : काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर.
Chakan News : एमआयडीसीतील खड्ड्याची पूजा करून आंदोलन





