अकोले -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर प्राप्तीकर खात्याने केलेली कारवाई आकसबुद्धीने झाली नसल्याची भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अकोले येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली. आठवले हे शुक्रवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्याला आले होते. त्याची सुरुवात त्यांनी राजूरपासून केली. तेथे त्यांनी माजीमंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर खात्याची कारवाई आकसबुद्धीची नसल्याची भूमिका मांडली. आठवले म्हणाले, अनावश्यक संपत्ती व आर्थिक व्यवहाराची अनियमितता यावर स्वायत्त असणाऱ्या प्राप्तिकर विभागाने आपली कारवाई केली. त्यामुळे याचा केंद्राशी दुरान्वयाने संबंध नाही. मात्र, अजित पवार यांच्यावर पाटबंधारे विभागाच्या संदर्भात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखिमपूर घटनेची तुलना “जालियनवाला बाग’ या घटनेशी केलेली आहे. त्याकडे आठवले यांचे लक्ष वेधले असता त्यांनी जालियनवाला बाग घटनेशी लखिमपूर घटनेशी तुलना करणे अयोग्य आहे. एकूणच या प्रकाराबाबत राज्यात पुकारलेला बंदही अनाठायी आहे, असे ते म्हणाले. राज्यात सहभागी असणाऱ्या पक्षाने किंवा महाविकास आघाडी सरकारच्या घटकाने सत्तेत असताना राज्यात बंद पुकारणे अयोग्य आहे. उलट अशा प्रकारची भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी घटनेचा निषेध करायला हवा होता. परंतु अशाप्रकारे राज्याला वेठीला त्यांनी धरू नये. असे त्यांनी आवाहन केले. त्याकाळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा त्यांनी सवाल उपस्थित केला. स्वायत्त शासकीय विभागांकडून पवार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात असेल, आणि त्यांच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त स्थावर-जंगम मालमत्ता असेल, तर ती चौकशी होऊ शकते. आणि जर ते दोषी आढळले नाहीत, तर त्यांना दिलासाही मिळेल, अशी भूमिकाही आठवले यांनी येथे मांडली.