Mahakali Film: ‘महाकाली’च्या भूमिकेत दिसणार दिग्गज क्रिकेटपटूची लेक; फर्स्ट लुक समोर
Mahakali Film: 'सलार: पार्ट १ - सीझफायर' चित्रपटातही साकारली भूमिका

Mahakali Film: प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘महाकाली’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
यानंतर ‘महाकाली’च्या टीझरमध्ये अखेरीस महाकालीचीही झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री श्रिया रेड्डी ही महाकालीची भूमिका साकारणार आहे. तिने यापूर्वी कन्नड आणि तेलुगू टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस कन्नड’मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी
२८ नोव्हेंबर १९८२ रोजी जन्मलेली श्रिया एका प्रतिष्ठित क्रीडा पार्श्वभूमीतून येते. ती भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू भरत रेड्डी यांची मुलगी आहे. भरत रेड्डी यांनी १९७८ ते १९८१ दरम्यान भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
इतकेच नाही तर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी दिनेश कार्तिकसारख्या प्रसिद्ध भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजालाही सुरुवातीला कोचिंग दिले आहे.
View this post on Instagram
श्रियाने तिच्या फिल्मी प्रवासाची सुरुवात २००२ मध्ये बालाजी शक्तिवेल यांच्या ‘सामुराई’ चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये अभिनेता विक्रम मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात तिची भूमिका छोटी होती.
यानंतर तिने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अप्पुदापुडु’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. पण श्रियाने आपली मेहनत सुरू ठेवली आणि ‘वेयिल’ तसेच ‘कांचीवरम’ सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमधील आपल्या अभिनयाने समीक्षकांची मनं जिंकली.
त्यानंतर तिने ‘सलार: पार्ट १ – सीझफायर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात ‘राधा रामा मन्नार’ची आयकॉनिक भूमिका साकारली होती. यानंतर आता ‘महाकाली’मधील तिचा लुक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
टीझरमध्ये काय आहे?
‘महाकाली’च्या टीझरची सुरुवात एका लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजाने होते. त्यानंतर अक्षय खन्नाचा आवाज ऐकू येतो. शुक्राचार्यांच्या भूमिकेत तो देव आणि असुर यांच्यातील भेदभावावर प्रश्न उपस्थित करताना दिसतो.
समुद्रमंथनात देव आणि असुरांचे समान योगदान असतानाही अमृत केवळ देवांना मिळाले, इंद्राच्या सिंहासनावर असुरांचा अधिकार नाकारण्यात आला आणि संपूर्ण असुर कुळाला पाताळलोकात पाठवण्यात आले, असे प्रश्न शुक्राचार्य उपस्थित करतात.
‘हा धर्म आहे की अधर्म?’ असा सवाल करत तो असुरांच्या विजयाची घोषणा करताना दिसतो.यानंतर अक्षय खन्नाचा दमदार लूक समोर येतो.
‘महाकाली’ हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.
हेही वाचा:





