Bank Robbery: इकडे बुलडाणा अर्बन बॅँक दरोड्यातील आरोपी पकडले, तिकडे बुलडाणा जिल्ह्यात स्टेट बॅंकेवर दरोडा

जालना – जालनाच्या अंबड तालुक्यातील शहागड येथे बुलडाणा अर्बन बँकेवर गुरूवारी (ता.28) भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. आरोपींनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत 25 लाख रुपये रोकड आणि 75 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
या बँकेत 3 आरोपींनी दरोडा टाकला होता. ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलिसांनी गुन्हा दखल केला होता. हा दरोडा टाकणाऱ्या 3 पैकी 2 आरोपींना बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक करण्यात आली आहे.
गेवराई पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळून या आरोपींना गोंदी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास गोंदी पोलिस करत आहेत. पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत बॅंकेवर दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये चार ते पाच चोरांनी भरदिवसा महाराष्ट्र बँकेत दरोडा टाकला होता. चोरट्यांनी दोन कोटी 31 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दोन महिन्यांआधी विरारमध्ये आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. त्या दरोड्यात तर बँकेच्या एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. याशिवाय पुण्यातील घटनेनंतर जालन्यात अशी घटना अवघ्या आठ दिवसात समोर आली आहे.
अशातच आज शनिवार (ता. 30) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर मध्यरात्री दरोडा पडल्याची घटना घडली आहे. जवळपास 20 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटून नेल्याची प्राथमिक माहिती आहे.





