शिरूरच्या सरोदे हॉस्पिटल हल्ला प्रकरणी आरोपीस ६ महिन्यांची सक्तमजुरी

शिरूर – शिरूर शहरातील प्रसिद्ध सरोदे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करणाऱ्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपी सुरेश ज्ञानोबा ओतारी यास ६ महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. हुडको कॉलनी येथील रहिवासी नारायण मारुती सरोदे (वय ५७) यांचे रामआळी येथे सरोदे हॉस्पिटल आहे. त्यांच्या पत्नी अलका सरोदे या शिरूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत.
दि. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी सुरेश ओतारी (रा. डंबेनाला, शिरूर) हा दारूच्या नशेत हातात लाकडी दांडका घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसला. त्याने पैशांची मागणी करत डॉ. सरोदे यांना शिवीगाळ केली आणि दांडक्याने मारहाण केली.
अलका सरोदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना ढकलून “तुमच्या मुलाचे लग्न कसे होईल, ते पाहतो. तुला जीवे मारतो,” अशा धमक्या दिल्या. या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५२, ३२४, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार उमेश भगत यांनी केला, तर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि संतोष घोळवे, तसेच कोर्ट अंमलदार हवालदार तुकाराम गोरे आणि महिला पोलीस मनीषा फंड यांनी सहकार्य केले.
सदर खटल्याची सुनावणी जे. ए. झारी सो कोर्टात झाली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता सागर वसंत कदम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली, तर अॅड. शिवशंकर हिलाळ आणि अॅड. अक्षय घावटे यांनी फिर्यादींना मार्गदर्शन केले. आठ साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांवरून आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला.
दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने आरोपी सुरेश ओतारी यास भादंवि कलम ३२३ अंतर्गत ६ महिने आणि कलम ४५२ अंतर्गत ६ महिन्यांची सक्तमजुरी अशी एकूण ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालाचे शिरूर शहरात स्वागत होत असून, कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.





