Saswad : पांगारे खूनप्रकरणातील आरोपी गजाआड
Saswad : गुरुवारी (दि. १९) ही घटना घडली आहे. उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.

सासवड : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील महिलेच्या खूनप्रकरणी सासवड पोलिसांनी अवघ्या सात तासांत आरोपीला अटक केली. शशिकांत माणिकराव काकडे (रा. पांगारे), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणातील दुसरी आरोपी महिला सुलोचना काकडे हिचा शोध पोलीस घेत आहेत.
गुरुवारी (दि. १९) ही घटना घडली आहे. उज्वला रामदास काकडे (वय ४७, रा. पांगारे), असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळ, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला.
आरोपी चारचाकी वाहनाने पळून गेल्याचे तपासात समोर आले. त्याने सातारा जिल्ह्यातील शिरवळ परिसरात वाहन सोडून डोंगराळ भागातून पलायन केले होते. त्यानंतर सासवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. दरम्यान, आरोपीला सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला (दि.23) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. अमोल गर्जे यांनी काम पाहिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर राजपूत, वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, सासवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.
आई- वडिलांचे छत्र हरपले
उज्जवला काकडे यांच्या मुलीचा घटनेदिवशीच वाढदिवस होता. काकडे कुटुंबीयात या मुलीचे पहिलाच पितृछत्र हरपले होते. त्यातच त्याच दिवशी तिच्या आईची हत्या झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांचे प्रेम आणि आधार मिळण्याच्या वयात या चिमुकलीला माता- पित्यांना गमवावे लागल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.




