पुणे – शहरातील करोनासंबंधी माहितीच्या विश्लेषणसाठी महापालिकेस “आयुका’ अर्थात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍन्ड ऍस्ट्रोफिजिक्स संस्थेकडून मदत केली जात आहे.
करोनासंबंधित माहिती दिल्यानंतर तिच्या विश्लेषणाच्या आधारावर शहरात करोनाची साथ रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना शक्य होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. “आयुका’कडून जगभरातील प्रमुख करोनाबाधित शहरे तसेच देशांच्या माहितीच्या आधारावर पुणे शहराच्या स्थितीचे विश्लेषण केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाला करोनाविरोधातील लढाईचे नियोजन करणे शक्य होत आहे.
शहरात दि.9 मार्च रोजी पहिला करोनाबाधित सापडला होता. आता हा आकडा 11 हजारांवर गेला आहे. मात्र, त्याच वेळी शहरात वाढणारे करोनाचे बाधित, चाचण्यांचे प्रमाण, मृत्यूची आकडेवारी, बाधित दुप्पट होण्याचा कालावधी, सक्रीय बाधित दुप्पट होण्याचा कालावधी, भविष्यात वाढणारी बाधितांची संभाव्य संख्या, त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा याबाबतचे विश्लेषण करण्यासाठी महापालिकेस “आयुका’ची मदत होत आहे. येथील तज्ज्ञांच्या मदतीने या माहितीचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे महापालिकेस शहरातील संभाव्य रुग्णवाढ, साथ आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत निर्णय घेणे सोपे होते असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.