पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड महपालिका भवनासमोरच ग्रेडसेपरटेरमध्ये मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्य़ांमुळे दररोज वाहनांचे अपघात होत आहेत. परंतु, तेथे कोणतीही दुरस्ती केली जात नाही. त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात होऊन नागरिकांचा जीव जाण्याची वाट महापालिका प्रशासन बघत आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दापोडी ते निगडी या पट्ट्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने ग्रेड सेपरेटर बांधले. मात्र, यातील रस्त्यांचे दोन स्लॅब एकमेकांना जोडण्याच्या ठिकाणी वारंवार खड्डे पडतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानेही खड्डे पडतात. त्यातून अपघात घडतात. महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील ग्रेड सेपरेटरमध्ये दररोज अशा खड्ड्यामुळे वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहे. याच ठिकाणी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खड्ड्य़ामुळे मोटारीने ब्रेक लावल्यामुळे पाठीमागून येणारी तीन दुचाकी वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाले. वेगात असलेली वाहने या खड्ड्यात आदळल्याने अचानक थांबतात. त्यामुळे मागून येणारी वाहने थांबलेल्या वाहनांवर धडकतात. यातून वादावादीचे प्रकारही घडत आहेत. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून मोठा अपघात घडल्यानंरच प्रशासनाला जाग येणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पिंपरी येथील गेडसेपरटरमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाहणी करण्यात आली असून वाहतूक पोलिसांशी चर्चा करून येत्या तीन दिवसांत ते बुजविण्यात येतील. – विजय भोजने, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका