पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) -मुलाला शाळेत सोडण्यासाठी चाललेल्या आईच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. आई एका बाजूला तर मुलगा दुसऱ्या बाजूला पडला आणि ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन आईच्या डोळ्यादेखतच मुलाचा अपघाती मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना शाहूनगर, चिंचवड येथे गुरुवारी (दि. 24) सकाळी घडली.
अथर्व रवींद्र आळणे (वय 11, रा. स्पाइन सिटी मॉलजवळ, एमआयडीसी, भोसरी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. अथर्व हा काळभोरनगर, चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. गुरुवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास त्याची आई हर्षदा आळणे या अथर्वला घेऊन दुचाकीवरुन शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. शाहूनगर येथील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीला मोटारीची धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवर असलेल्या हर्षदा या रस्त्याच्या एका बाजूला पडल्या तर त्यांच्यासोबत शाळेत चाललेला अर्थव दुसऱ्या बाजूला पडला. त्याचवेळी बाजूने चाललेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली अर्थव आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात हर्षदा किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी ट्रक चालक आणि चारचाकी चालकांना ताब्यात
घेतले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
सहा वर्षापूर्वीच्या घटनेची आठवण
सहा वर्षापूर्वी आपल्या लहान मुलाला घेऊन त्याची आई दुचाकीवरून चालली होती. डांगे चौक ते भूमकर चौक या दरम्यानच्या रस्त्यावर त्यांना अपघात झाला. या घटनेतही डंपरखाली मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर बेशुद्ध पडलेल्या आईला रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. मला एकदा मुलाला पाहायचे आहे, असा हट्ट त्या माऊलीने धरला होता. मुलगा जगात नसल्याचे लक्षात येताच ती माऊली पुन्हा बेशुद्ध पडली. बुधवारच्या शाहूनगर येथील घटनेमुळे डांगे चौकातील त्या घटनेची पुन्हा एकदा आठवण झाली.