माथेरान येथे आलेल्या पर्यटकांसोबत दुर्घटना; शारलोट तलावात बुडालेल्या तिघांचा मृत्यू

माथेरान: माथेरानमधील प्रसिद्ध शारलोट लेक परिसरात रविवारी (दि. १५) नवी मुंबईहून आलेल्या तिघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुमित चव्हाण (१६), आर्यन खोब्रागडे (१९) आणि फिरोज शेख (१९) अशी मृतांची नावे असून ते कोपरखैरणे आणि परिसरातील रहिवासी होते.
एकूण १० जणांच्या ग्रुपसह हे तिघे माथेरानमध्ये पर्यटनासाठी आले होते. रविवारी दुपारी शारलोट लेक परिसरात पोहोण्यासाठी गेलेल्या या तिघांचा पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तलावाची खोली अधिक असल्याने त्यांना वाचविता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस, सह्याद्री रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम हाती घेतली. रात्री दहाच्या सुमारास तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माथेरानच्या शारलोट तलावात पर्यटकांसोबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल टीका होत आहे. तलाव परिसरात धोकादायक ठिकाणी कुंपण लावणे, चेतावणी फलक असणे, सीसीटीव्ही बसविणे, सुरक्षारक्षक आणि सेफ्टी जॅकेटची सोय, रस्सी, न डुबणारे बलून यांसारख्या सुविधा असणे अत्यावश्यक आहे. परंतु अशा सुविधा घटनास्थळी दिसून येत नाही, किमान या दुर्घटनेनंतर तरी स्थानिक प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचे आवाहन
माथेरानमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी देखील स्वतःची सुरक्षितता ओळखून धोकादायक ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सेल्फी किंवा साहसाच्या नादात जीव धोक्यात घालणे टाळावे. पर्यटनस्थळी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तत्काळ कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.





