रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खामगावजवळ एक धक्कादायक रिक्षा अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख संतोष सावंत यांच्यासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सावंत हे पियाजिओ रिक्षा घेऊन गोरेगावच्या दिशेने जात होते. रिक्षात दोन प्रवासी, शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे, बसले होते. गोरेगाव मार्गावरील ताम्हाणे शिर्के ते कासार मलाई दरम्यान रिक्षाचा ब्रेक फेल झाल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जोरदार आदळले. या भीषण अपघातात रिक्षा चालक संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या शांताराम आणि शर्मिलाबाई यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.