Accident News : मध्य प्रदेशात भीषण अपघात ! ट्रेलर व्हॅनवर उलटल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू

झााबुआ : मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सजेली फाट्याजवळ सिमेंटने भरलेला ट्रेलर व्हॅनवर उलटल्याने पाच अल्पवयीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला आणि रस्त्यावर काचांचा खच पडला.
मुकेश खापेड (४०), सावली खापेड (३५), विनोद खापेड (१६), पायल खापेड (१२), माधी बामनिया (३८), विजय बामनिया (१४), कांता बामनिया (१४), रागिनी (९) आणि अकली परमार (३५) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मानपूर येथील लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नोगावा गावाजवळ सजेली फाट्यावर संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रेल्वे ओव्हरब्रिजवरून ट्रेलर थेट कारवर उलटला. यात कारमधील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच थांदला आणि मेघनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांनीही गर्दी करत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अपघाताबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली.





