Accident News : धक्कादायक ! अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अवलकोंडा गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव शिवकन्या खेळकर असून, तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर घरात आणि परिसरात मन हेलावणारा आक्रोश पाहायला मिळाला.
घटनेच्या वेळी गावाच्या शिवारातून माती वाहून नेण्याचे काम सुरू होते. गावातील अरुंद रस्त्यांवरून मातीने भरलेले ट्रॅक्टर ये-जा करत होते. त्याच वेळी अंगणात खेळत असलेल्या शिवकन्याच्या अंगावर ट्रॅक्टरचं चाक गेलं आणि ही भीषण दुर्घटना घडली. या प्रकरणातील ट्रॅक्टर चालक सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, गावात शोककळा पसरली आहे.
या भीषण घटनेनंतर ट्रॅक्टर चालक गौस बागवान हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून, दोषी चालकावर कडक कारवाईची मागणी होत आहे.





