Accident News : मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावाटी तालुक्यातील हरसावा गावाजवळ भीषण रस्ता अपघात घडला आहे. या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. काय घडले नेमके? मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मणगढ येथून फतेहपूरकडे निघालेल्या एका कारमध्ये एकाच कुटुंबातील ८ महिला होत्या. या महिला आपल्या आजोबांच्या बहिणीच्या अंत्यविधीला (वय ८० वर्षे) उपस्थित राहून परतत होत्या. कुटुंबातील पुरुष सदस्य इतर चार वेगळ्या कारमध्ये होते. फतेहपूरजवळील हरसावा गावाजवळ येणाऱ्या रस्त्यावर ट्रक आणि कार यांच्यात आमने-सामने भीषण धडक झाली. ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने थेट कारला धडक दिली. या धडकेत कार पूर्णपणे उध्वस्त झाली आणि कारमधील महिला मृतदेह कारच्याच आत अडकले. पोलिस कारवाई अपघात झाल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ कारमधील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमी असलेल्या तीन जणांना तातडीने जवळच्या धानूका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात मृत्यू झालेल्या ६ महिलांच्या मृतदेहांना धानूका रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या मदतीने चक्काचूर झालेली कार रस्त्यावरून हटवली आणि वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कारचा ड्रायव्हर आणि आणखी दोन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, “आजोबांची बहिण (वय ८०) यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी आम्ही सर्वजण गेलो होतो. परतताना ही दुर्दैवी घटना घडली. घरातील पुरुष मंडळी वेगळ्या कारमध्ये होते, त्यामुळे ते सुरक्षित आहेत. पण एकाच कारमधील सर्व महिला…” असे म्हणत ते भावुक झाले. अपघातानंतर स्थानिक आमदार हाकम अली खां आणि भाजप नेते मधू सूदन भिंदा यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि कुटुंबीयांना आधार दिला. ही घटना मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी अपघाताची अधिक तपासणी सुरू केली असून, ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.