Alandi Accident: आळंदी शहरातील गणपती मंदिर चौक परिसरात गुरुवारी (दि. १४) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ६३ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आन्नपूर्ण माणिकराव रोकडे (वय ६३, रा. विकासवाडी, धनोरे फाटा, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास हरिपाठ उद्यानाजवळील गणपती मंदिर चौक परिसरात हा अपघात घडला. मोटारसायकलस्वाराचा अचानक तोल गेल्याने दुचाकी रस्त्यावर घसरली. यावेळी समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरखाली आन्नपूर्ण रोकडे या आल्याने त्यांच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आठवड्यात दुसरा अपघाती मृत्यू – दरम्यान, तीन दिवसांपूर्वी PMPML बस स्थानकात प्रवेश करीत असताना बसचे मागील चाकाखाली आल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तसेच चाकण चौक येथेही एका अपघातात एक जण जखमी झाले होते. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये रस्त्यावर वावरताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.