Accident Death: रस्ते अपघातात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 87 टक्के; तीन वर्षांची आकडेवारी पहा

नागपूर – राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील साडेतीन वर्षांत झालेल्या एकूण अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये ८७ टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यात एकूण १४ हजार १७० अपघात झाले. त्यात ११ हजार ८९८ नागरिक जखमी तर ७ हजार २२९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये ६ हजार ३२६ महिलांचा समावेश आहे. २०२१ मध्ये १ हजार ३६८, २०२२ मध्ये १ हजार ६३२, २०२३ मध्ये १ हजार ८६७ तर जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान १ हजार ४५९ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर २०२१ मध्ये ७ हजार ५०१ अपघातात ४ हजार ८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ६ हजार ३२८ अपघातात ३ हजार ४११ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ४१७ अपघातात ४ हजार ९२३ लोकांचा मृत्यू झाला. तर राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. २०२३ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८८१ अपघातात ५ हजार ७८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले.
जानेवारी २४ ते ऑक्टोबर २४ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ३४८ अपघातात ४ हजार ६८१ मृत्यू झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. त्यामुळे राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यू जास्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.
१८ वर्षांखालील १,२२९ जणांचा मृत्यू
राज्यात २०२१ ते २०२३ दरम्यान रस्ते अपघातात दगावणाऱ्यांमध्ये १८ वर्षांखालील १ हजार २२९ जणांचा समावेश आहे. २०२१ मध्ये ३७३ मृत्यू, २०२२ मध्ये ४५४ मृत्यू, २०२३ मध्ये ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.




