सातारा – बॅंकेने कर्जाच्या रकमेपोटी सील केलेला भूखंड ताब्यात देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी दहा हजारांची लाच स्वीकारताना साताऱ्यातील मंडल अधिकाऱ्यास एका खासगी व्यक्तीसह लाचलुचपत विभागाने गजाआड केले. शिवाजी बबन पिसाळ (रा. संगमनगर, सातारा) असे अटक केलेल्या मंडल अधिकाऱ्याचे तर सतीश किसन कुंभार (रा. करंजे, सातारा) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, सातारा शहराजवळ असलेल्या एका हॉटेलचा भूखंड तीन कोटींच्या कर्जापोटी आयडीबीआय बॅंकेने ताब्यात घेत सील केला होता. त्यानंतर बॅंकेशी असलेला कर्जाचा व्यवहार तक्रारदाराने पूर्ण केल्यानंतर तो भूखंड त्यांना ताब्यात दिल्याचा अहवाल तहसीलदारांना पाठवण्यासाठी पिसाळ याने पंधरा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदार व पिसाळ यांच्यात तडतोड झाल्यानंतर पिसाळने दहा हजाराची लाच स्वीकारण्यास सहमती दाखवल्यानंतर तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. विभागाने लाच मागणी होत असल्याची खात्री करून दि. 21 रोजी खासगी व्यक्ती कुंभार याच्या घराजवळ असलेल्या एका किराणा दुकानाजवळ सापळा लावला.
त्यावेळी पिसाळ याच्या सांगण्यावरून कुंभार हा तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करून पिसाळ व कुंभार यांना अटक करून रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला, हवालदार साळुंखे, विनोद राजे, संभाजी काटकर, विशाल खरात यांनी ही कारवाई केली.