ACB Action: राज्यातील लाचखोरीविरोधातील कारवायांचा धडाका कायम असतानाच नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी मोठी कारवाई करत सिडकोमधील अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. रामदास जगताप असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते सिडकोच्या भूमी व भूमापन विभागात कार्यरत होते. एसीबीच्या पथकाने जगताप यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिडको कार्यालयातच पकडले. या कारवाईमुळे सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबई एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. संबंधित प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एसीबीने लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीचे प्रकार सुरूच असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे शहर पोलीस दलातील एका महिला अधिकाऱ्यालाही एसीबीने मोठी कारवाई करत अटक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. ही कारवाई थेट पुणे पोलीस आयुक्तालय परिसरात झाल्याने पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली होती. राज्यात वाढत्या एसीबी कारवायांमुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, लाचखोरीविरोधातील मोहिम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.