अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकाला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : कॉलेजमधील व्हॉट्सऍप ग्रुपवरून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के. के. जहागिरदार यांनी सुनावली. दंड न भरल्यास त्याला एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
भिमराव ज्ञानोबा वावळे (वय 25, बेनकर वस्ती, धायरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पीडितेच्या वडिलांनी सिंहगडरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक सीमा चौधरी यांनी तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी संजय जाधव यांनी मदत केली. डीएनए चाचणी अहवाल, पीडितेची साक्ष आणि सरकारी पक्षाने ती अल्पवयीन असल्याचे सिद्ध केल्याचे महत्त्वाचे ठरले. मार्च 2019 मध्ये हा प्रकार घडला. दोघांमध्ये झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने अत्याचार केला. त्यातून पीडित गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
अल्पवयीन पीडितेची संमती ग्राह्य धरता येणार नाही
उलटतपासणीमध्ये त्या मुलीने संमतीने शरीर संबंध झाल्याचे म्हटले आहे. मात्र, ती अल्पवयीन होती. त्यामुळे तिची संमती ग्राह्य धरता येत नाही. ती अल्पवयीन असल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केल्याची माहिती विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी केली.


