अबाऊट टर्न: वीरश्री

– हिमांशू

माणसाची प्रतिष्ठा त्याला मिळणाऱ्या लाइक आणि शेअरच्या संख्येवर ठरवण्याचा जमाना आला आहे. पैशापाठोपाठ प्रसिद्धी हे प्रतिष्ठेचं दुसरं लक्षण ठरलंय आणि हातात सेलफोन असलेल्यांना प्रसिद्धीची फिकीर करण्याचं कारण उरलेलं नाही. काहीतरी अजब करून व्हिडिओ टाकला की लाइक आणि शेअर सुरूच होतात. एका छोट्याशा व्हिडिओमुळं कितीतरी जणांचं आयुष्य बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. दोन वर्षांपूर्वी केरळमधल्या एका मुलीचा भुवया उडवतानाचा आणि डोळा मारतानाचा व्हिडिओ इतका गाजला होता, की तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आजमितीस अनेक तरुण या मार्गानं आपल्याला रातोरात काही संधी मिळते का, याचा शोध घेताना दिसतात. युवकांच्या या जगात ज्येष्ठांना अजिबात स्थान नाही. ज्येष्ठांकडून अनुभवाचे बोल ऐकणं सोडाच; पण त्यांची साधी दखल घेण्याचीही सवड कुणाला राहिलेली नाही. वृद्धांना घरातला किंवा वृद्धाश्रमातला कोपरा दाखवून अनेकजण इंटरनेटच्या आभासी दुनियेत आकंठ बुडाले आहेत आणि इंटरनेटचा स्पीड वाढणार हीच त्यांच्या दृष्टीनं एकमेव खुशखबर असू शकते.

अशा या तरुणाईनं सळसळणाऱ्या विश्‍वात तमिळनाडूतल्या आजी-आजोबांनी हक्‍कानं स्थान मिळवलं. एवढंच नव्हे तर सर्वाधिक लाइक आणि शेअरही मिळवले. त्यासाठी त्यांना मोबाइलच्या कॅमेऱ्याचीही गरज भासली नाही आणि व्हिडिओ अपलोड करण्याचे कष्टही पडले नाहीत. सीसीटीव्हीत त्यांचा कारनामा आपोआप चित्रित झाला आणि भलताच लोकप्रियही झाला.

तिरुनेलवेली भागात हे आजी-आजोबा राहतात. वस्तुतः एकटे राहणारे आजी-आजोबा हा चिंतेचा, चिंतनाचा आणि वृत्तपत्रीय लेखांचा विषय. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अशा अनेक आजी-आजोबांना चोरट्यांनी लुटल्याच्या, प्रसंगी त्यांचा जीव घेतल्याच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. अशी घटना घडली, की कुटुंबाच्या बिघडलेल्या घडीविषयी आणि वृद्धांच्या अगतिकतेविषयी बोललं, लिहिलं जातं आणि नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! तमिळनाडूतल्या आजी-आजोबांनी हा मुद्दाच निकाली काढला. घरात शिरलेले दोन चोर या वृद्धांचा रुद्रावतार पाहून पळून जाताना व्हिडिओत दिसले. एका चोरानं ओसरीवरच्या खुर्चीवर बसलेल्या वृद्धाच्या मागून येऊन कापडानं त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. वृद्धानं प्रतिकार सुरू केला आणि आवाज ऐकून आजीबाई बाहेर आल्या. तिनं चोरट्यावर चपलांचा भडीमार सुरू केला. चोरटा बिथरला आणि आजोबांनी त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. तेवढ्यात दुसरा चोरटा फ्रेममध्ये आला. दोन्ही चोरांच्या हातात कोयते होते. तरीही आजी-आजोबांनी न डगमगता प्रतिकार सुरूच ठेवला. ओसरीवर दोन लोखंडी आणि दोन प्लास्टिकच्या खुर्च्या होत्या. एक प्लास्टिकचं स्टूल होतं. ही सगळी या वृद्ध दाम्पत्याची आयुधं बनली. हाताला येईल ते चोरांच्या दिशेनं भिरकावून त्यांनी संकट परतवून लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

या अनपेक्षित प्रतिकारानं चोरटे पुरते गांगरले. खरं तर हातात शस्त्रं असल्यामुळं ते या वयोवृद्धांवर कोणत्याही क्षणी ताबा मिळवू शकले असते. परंतु आजी-आजोबांचा आवेश आणि हालचालींमधली गती इतकी तीव्र होती, की चोरांनी अखेर काढता पाय घेतला. त्यानंतर घरात परतलेल्या आजी-आजोबांच्या विजयी मुद्रेसह हा व्हिडिओ सोशल मीडियाचा मुकुटमणी ठरलाय, याचा खरोखर आनंद झाला. ज्यांना तरुणांच्या विश्‍वात थाराच उरलेला नाही, त्या “तरुणां’ची सगळ्यांना दखल घ्यावीच लागली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×