– हिमांशू नव्या पारदर्शक जगात आपणा सर्वांचं स्वागत आहे. “माहितीचं युग’ म्हणून नावाजलेल्या या काळात सगळं काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. कोणतीही लपवाछपवी नाही. सरकारी धोरणं आणि घोषणांची प्रत्यक्षात पूर्तता किंवा अंमलबजावणी किती प्रमाणात झाली? एखाद्या रस्त्यावर असलेल्या टोलनाक्यावर आतापर्यंत किती कलेक्शन झालं? प्रत्यक्षात रस्त्याला खर्च किती आला? हप्ता वसूल केल्यासारखी आणखी किती वर्षे टोलवसुली सुरू राहणार? रस्ता तयार करण्यासाठी किती झाडं तोडली गेली? त्याचा लाकूडफाटा किती टन भरला? तो विकून किती पैसे आले? ते कोणाला मिळाले? अशा प्रश्नांची उत्तरं माहितीच्या अधिकाराचा वापर केला तरी सहजासहजी मिळणार नाहीत; पण आपण सर्वसामान्य लोक मात्र पूर्णपणे पारदर्शक झालो आहोत. आपला मोबाइल नंबर, जन्मतारीख, आधार नंबर, पासपोर्ट नंबर वगैरे बाबी सहजासहजी कुणालाही मिळू शकतील. सरकारच्या कोविन ऍपवरून डाटा लिक झाल्याच्या बातमीचा खुद्द सरकारने इन्कार केला असला, तरी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने या ऍपची पडताळणी सुरू केली आहे. डाटा चोरी झाल्याचं ठामपणे नाकारायचं असेल तर तातडीनं पडताळणी का सुरू केली, हा मुद्दा “डाटा कुणी चोरला,’ या प्रश्नाइतकाच गूढ ठरतो. कारण डाटा चोरीची ही घटनाच मुळात गूढ आहे. प्राप्त माहितीनुसार, एका चॅटबॉटने हा डाटा चोरला. याचाच अर्थ, मानवजातीच्या मागे लागू पाहणारी नवी साडेसाती चांगलीच सक्रिय झालेली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, टेलिग्राम या चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या ज्या अकाउंटवर डाटा लिक झालाय, तो अकाउंट चॅटबॉट ऑपरेट करीत होता; परंतु मंत्र्यांनी असंही म्हटलंय, की डाटा चोरी करणाऱ्याच्या डाटाबेसवरून चॅटबॉटने हा डाटा मिळवला. म्हणजे, डाटा चोरी आधीच झाली होती आणि चॅटबॉटच्या खोडसाळपणामुळे ती उघडकीस आली, असाच याचा अर्थ होत नाही का? असं असल्यास, कोविन ऍपसाठी घेतलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे, हा दावाही आपोआपच निकाली निघत नाही का? या घटनेचे संभाव्य दुष्परिणाम सांगताना तज्ज्ञ म्हणतात, की मिळवलेल्या नंबरवर संपर्क साधून सायबर गुन्हेगार संबंधिताला विश्वासात घेऊ शकतात आणि नंतर त्याची फसवणूक करू शकतात. ज्या अकाउंटवरून चॅटबॉटने डाटा लिक केला, तो चोरीची बातमी प्रसिद्ध होताच गूढरीत्या बंद झाल्याचे सांगितले जातेय, तर तो अकाउंट लगेच “सस्पेन्ड’ करण्यात आला, असेही काही माध्यमांनी म्हटलंय. पहिली शक्यता खरी निघाल्यास स्वयंचलित चॅटबॉट्स चोरी करून पळून जाण्याइतके हुशार झाले असावेत. चॅटबॉट्स अगदी माणसासारखा विचार करतात म्हणे! मग डाटा लिक करताना चॅटबॉट कुत्सितपणे हसलाही असेल का? पी. चिदंबरम, जयराम रमेश यांच्यासारख्या नेत्यांची व्यक्तिगत माहिती जाहीर झाल्यामुळे या चोरीकडे पटकन लक्ष गेलं. या डाटाचोरीचे नेमके परिणाम काय होतील, हे कळायला काही वेळ जावा लागेल. पण सरकारकडून ज्यावेळी एखादी माहिती देणं कम्पल्सरी केलं जातं, आपले अनेक व्यक्तिगत दस्तावेज एकमेकांशी कनेक्ट करणं बंधनकारक केलं जातं, तेव्हा ती माहिती सुरक्षित राखण्याची जबाबदारी कुणाची? हा प्रश्न अधिक गंभीरपणे विचारला पाहिजे. किंबहुना न विचारताच सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे.