– हिमांशू निवडणूक मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आली, याचाच अर्थ सर्वकाही नॉर्मल आहे. अर्थात, ती मुद्द्यांभोवती ङ्गिरत राहिली असती तरी निराशाच हाती आली असती. निवडणूक काळात माध्यमांचे प्रतिनिधी गावोगावी ङ्गिरून लोकांचे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, तिथेही हळूहळू मुद्दे अडगळीत पडून गुद्देच सुरू होतात. पण त्यामुळे किमान करमणूक तरी होते. मुद्द्यांवरची चर्चा नीरस झाल्यामुळेच ती गुद्द्यांवर येते. बहुतांश मतदारसंघांत पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार हेच अगदी प्राथमिक मुद्दे चर्चेत आहेत. वास्तविक, तेच ते मुद्दे चर्चेत येणं अपमानास्पद वाटायला हवं. आपल्याला कंटाळवाणं वाटू लागलंय, इतकंच! आपल्या प्रतिनिधीने जलवायू परिवर्तनावर बोलावं, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ङ्गायद्या-तोट्यांवर, आंतरराष्ट्रीय संबंधांवर, पावसाच्या अनियमिततेवरील उपायांवर, वारंवार येणार्या नैसर्गिक आपत्तींवर, प्लॅस्टिक निर्मूलनावर, जबाबदार पर्यटनावर, प्रदूषणावर किंवा वाढत्या व्यसनाधीनतेवर बोलावं असं आपल्यालाही वाटत नाही आणि प्रतिनिधीला तर नाहीच नाही. पण मुद्दे टाळले तरी ते असतात आणि आपल्यावर त्यांचा गंभीर परिणाम होत असतो. जलवायू परिवर्तन आणि त्यामुळे आपल्याभोवती घोंगावणारी संकटं हा तर अत्यंत गंभीर मुद्दा आहे. तथाकथित विकाससुद्धा आपण जिवंत आणि धडधाकट राहिलो तरच आपल्या उपयोगाचा आहे. परंतु आपण मात्र मांजरीसारखे डोळे मिटून दूध पीत आहोत. अजरबैजानमध्ये जलवायू परिवर्तनासंबंधीची 29 वी परिषद सुरू आहे. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ आणि त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम याविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत गंभीर चर्चा तिथं सुरू आहे. शेतीवर आणि समुद्रावर उपजीविका अवलंबून असणार्यांवर आर्थिक दुष्परिणाम यापूर्वीच झालेत. ते आणखी गंभीर होत आहेत. त्यातच या परिषदेत सिडनी येथील संशोधकांनी एका गंभीर विषयाची मांडणी केली. जलवायू परिवर्तनाचे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक परिणामही गंभीर असून, त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. वाढते तापमान आणि युवकांच्या मनात येणारे आत्मघाती विचार यामध्ये असलेला चिंताजनक संबंध त्यांनी उलगडून दाखवला. सरासरी दैनंदिन तापमानात एका अंशाची वाढ झाल्यास आत्महत्येचा विचार आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये 1.3 टक्क्यांनी वाढ होते, असं आकडेवारी सांगते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या भागात सरासरी तापमान 21.9 अंश असण्याच्या दिवसात ते 30 अंशांपर्यंत वाढलं, तेव्हा आत्महत्येचा विचार आणि कृतीचं प्रमाण 11 टक्क्यांनी वाढल्याचं दिसलं. थंड दिवसांच्या तुलनेत तापमान अधिक असण्याच्या दिवसांत आत्महत्येचा विचार मनात डोकावण्याचं प्रमाण वाढतं आणि हे गंभीर आहे. उकाडा प्रमाणापेक्षा थोडा वाढला तरी मनाची चलबिचल होते, काही सुचेनासं होतं हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. त्यामुळे तापमान वाढल्यास कामांचा वेगही मंदावतो. एसी घरात राहणारे, एसी गाडीतून एसी ऑङ्गिसमध्ये जाणारे लोक आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. बर्याच लोकांच्या नशिबात पंख्याचा वाराही नसतो. अशा देशांनी तर हे संशोधन खूपच गांभीर्यानं घेतलं पाहिजे. कारण आपल्याकडे उन्हाळा तर तीव्र असतोच; शिवाय तरुणांना निराश करणार्या गोष्टींचा आणि व्यसनांचाही अजिबात तुटवडा नाही.