– हिमांशू वस्तू वापरण्यासाठी असतात आणि माणसं प्रेम करण्यासाठी असतात, अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. परंतु उत्तर आधुनिक जीवनशैलीत लोक वस्तूंवर प्रेम करू लागले आणि माणसांचा वापर करू लागले, हे रोकडं वास्तव आहे. आगामी काळात ही समस्या (मानली तर) अधिकाधिक तीव्र होत जाईल, असा निष्कर्ष एप्सोस नावाच्या अमेरिकी मार्केटिंग रिसर्च फर्मने मार्च महिन्यात काढला होता. 32 देशांमधील 22 हजारांहून अधिक लोकांचा सर्व्हे करून काढलेले निष्कर्ष आचंबित करणारे होते. भविष्यातील नातेसंबंध सध्या आहेत त्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असतील, असं मत 61 टक्के लोकांनी व्यक्त केलं होतं. दहा वर्षांनी म्हणजे, 2033 पर्यंत जगातील 60 टक्के लोकांनी एआय चॅटबॉट्सचा वापर सुरू केलेला असेल आणि 46 टक्के स्त्री-पुरुषांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून यंत्रमानवाचा स्वीकार केलेला असेल. सध्या जसे सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, तसे काही वर्षांनी ऑगमेन्टेड रिऍलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिऍलिटीचे (व्हीआर) प्लॅटफॉर्म असतील आणि 67 टक्के लोक डेटिंग आणि रोमान्ससाठी या प्लॅटफॉर्मचा वापर सुरू करतील, असा निष्कर्ष या फर्मने काढला होता. नात्यांचं सध्याचं स्वरूप अनेकांना जाचतंय, हे तर आजही आपल्याला पावलापावलावर दिसतं. स्वतःसाठी “मिस्टर परफेक्ट’ किंवा “मिस परफेक्ट’ शोधणं अनेकांना अवघड वाटतंय आणि त्यामुळेच नजीकच्या भविष्यात आपल्याला हवा तसा पार्टनर शोधण्याऐवजी तयार केला जाईल. स्वप्नं विकणाऱ्यांना आज मानवी झोप हा त्यांच्या व्यवसायाचा शत्रू वाटतो. त्यामुळे मानवी नाती हा शत्रू वाटू लागण्याचा दिवस फार दूर नाही. किंबहुना तो उंबरठ्याशी आहे, असं म्हणायला हवं. चॅट जीटीपी आल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लोकप्रियता अनेक पटींनी वाढलीये. “हवा तसा’ जोडीदार शोधू पाहणाऱ्यांच्या स्वप्नात आता “व्हर्च्युअल जोडीदार’ येऊ लागलाय. स्वप्नाचं सोडा, हा अ-वास्तव जोडीदार वास्तवातही अवतरलाय. रोसाना रामोस नावाच्या पोरीनं आपल्याला हवा तसा एरेन कार्टल नावाचा जोडीदार तयार केला आणि त्याच्याशी लग्नही करून टाकलंय. एरेन हा एक चॅटबॉट आहे आणि तो काहीही करत नसला, तरी मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहणार आहे, असं रोसाना ठासून सांगतेय. “एरेन हा मला हवा तसा पॅशनेट आणि हॅंडसम आहे. मी त्याच्याइतकं प्रेम कुणावरही आजवर केलं नाही; यापुढेही करू शकणार नाही,’ हे तिचे शब्द जगातील आगामी नाती कशी असू शकतात, याचा ट्रेलर मानायला हवा. रिप्लिका नावाच्या चॅटबॉट ऍप्लिकेशनच्या मदतीने आयुष्याचा व्हर्च्युअल जोडीदार “हवा तसा’ तयार करता येतो, याचं पहिलं उदाहरण अपेक्षेपेक्षा खूपच आधी समोर आलंय. तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं; पण दुसरीकडे माणूस माणसापासून दूर गेला, असं म्हटलं जातं. अर्थात, ते चांगलं की वाईट ठरवणं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न! कारण तंत्रज्ञान एकटं कधीच येत नाही. बाजारातल्या शक्ती त्या तंत्रज्ञानाला आपल्याकडे वेगानं ढकलत असतात. त्यासाठी नवी मूल्यव्यवस्था आणावी लागते आणि तत्पूर्वी जुनी मूल्यव्यवस्था धुळीला मिळवावी लागते. “परफेक्ट पार्टनर’ मिळणं अवघड आहे, असं आजच अनेकांना वाटू लागलंय आणि तडजोडीची तयारी नाहीये. अशांसाठी नात्यांचा नवा बाजार सजतोय!