हिमांशू
व्यवसायात काही “इथिक्स’ म्हणजे व्यावसायिक नैतिकता पाळायची असते, असं (फक्त) म्हणतात! प्रत्यक्षात आपलं काम इमानदारीत करणारा आणि नीतिमत्तेचं दर्शन घडवणारा एकच व्यावसायिक होऊन गेला- लाकूडतोड्या! सोन्या-चांदीची कुऱ्हाड “माझी नाही’ म्हणून नाकारणारा लाकूडतोड्या सध्याच्या काळात मिळणं “मुश्किल ही नही… नामुमकिन हैं!’
त्यातल्या त्यात जेव्हा संकटाची घडी येते, तेव्हा तिचं संधीत रूपांतर कसं करावं, याचे वर्ग घेणारे पैशाला पासरी उपलब्ध असतातच; त्यामुळे करोनाच्या संकटकाळात नीतिमत्तेचं वगैरे दर्शन घडेल ही अपेक्षा बाळगणं आत्यंतिक भाबडेपणाचं आहे. “रेमडेसिविर’ नावाच्या इंजेक्शनच्या बाबतीत जे काही दिसलं, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी शरमेनं डोळे बंद करून घेतले आणि बऱ्याच रुग्णांचे डोळे आपोआप बंद झाले… कायमचे! सरकारी कोट्यात इंजेक्शनचा ठणठणाट असताना राजकीय पक्षांचे पुढारी रेमडेसिविरचं मोफत वाटप करतात आणि “”कोणत्याही दरानं इंजेक्शन द्या,” असा टाहो फोडणाऱ्यांच्या हाताला काही लागत नाही.
इतकी टोकाची “नैतिकता’ पाहिल्यानंतर कोण, कुणाकडून, कसली अपेक्षा करणार? रेमडेसिविरचा काळाबाजार हा तर करोनाच्या पहिल्या लाटेपासून गाजलेला विषय आहे. या इंजेक्शनची खरीखुरी किंमत किती आहे, हे अजूनही सर्वसामान्यांना कळलेलं नाही. त्यामुळे कोण किती पट नफा कमावतोय, याचा अंदाज कसा लावणार? अशा या अंधेरनगरीत परिस्थितीचं गांभीर्य ओळखून नीतिमत्तेची बूज राखली ती चक्क एका चोरानं!
हा चमत्कारिक प्रकार हरियाणात घडला. जिंद शहरातल्या सरकारी रुग्णालयातून चोरानं रात्री काही औषधं चोरली. परंतु आपण जे चोरलंय, त्या करोनाच्या लसी आहेत, हे त्याला दुसऱ्या दिवशी समजलं. त्यात कोविशिल्डचे 182 तर कोवॅक्सिनचे 440 डोस होते. सहाशेपेक्षा जास्त लोक आता आपल्यामुळे धोक्यात येणार, हे लक्षात येताच चोर ओशाळला. रुग्णालयाच्या परिसरात जे पोलीस स्टेशन होतं, त्याच्या समोरच्या चहाच्या टपरीवर तो दुसऱ्या दिवशी गेला. तिथं एक वयोवृद्ध माणूस बसला होता. “”या पिशवीत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यासाठी जेवणाचा डबा आहे,” असं सांगून त्यानं लसींची पिशवी वृद्धाच्या ताब्यात दिली.
वृद्धाने ती पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिली. ती उघडून पाहिल्यावर त्यात लसी सापडल्या. चोरानं पिशवीत एक चिठ्ठीही ठेवली होती. त्यात लिहिलं होतं, “”सॉरी, मला माहीत नव्हतं, या करोनाच्या लसी आहेत.” चोराची ही नैतिकता एका स्थानिक आयएएस अधिकाऱ्याला एवढी भावली, की त्याने नैतिकतेला तिलांजली देणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कॅप्शन देऊन त्या चिठ्ठीचा फोटो व्हायरल केला. “”एका चोराने साठेबाजांना आणि नफेखोरांना माणुसकीची शिकवण दिली आहे,” अशी ती कॅप्शन आहे. अर्थात, नफेखोरांवर अशा गोष्टींचा परिणाम होणं केवळ अशक्य!
संकटाचं संधीत रूपांतर करणं हा व्यक्तिगत जीवनात येणाऱ्या संकटांच्या बाबतीत खरोखर चांगला धडा आहे; परंतु त्याचा भलताच अर्थ घेऊन करोनाच्या प्रसारकाळात हजारो लोक कोट्यवधींची माया जमवत आहेत, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येण्याजोगी नाही. समाजावर येणाऱ्या संकटांचं रूपांतर व्यक्तिगत संधीत करण्याला नैतिकता म्हणत नाहीत, हे एका चोराला समजलं. आपण चोरलेल्या वस्तूचा आपल्याला उपयोग नाही, हे लक्षात आल्यावर ती फेकून देण्याऐवजी परत करणारा हा आधुनिक लाकूडतोड्याच!