हिमांशू “सोशल मीडिया नावाची कटकट आपल्याकडे येऊन किती वर्षे झाली?’ असं कुणी विचारलं तर आजमितीस तो सगळ्यात जास्त ट्रोल होईल. त्याला “तंत्रज्ञानाचा शत्रू’ म्हटले जाईल. अशी माणसे आधुनिक युगात राहण्याच्या योग्यतेची नाहीत, असे म्हटले जाईल. ज्या ज्यावेळी नवतंत्रज्ञान आले, त्या त्यावेळी त्याला विरोध झाला आणि प्रत्येक वेळी विरोध करणारेच व्हिलन ठरलेत. वस्तुतः अनेकदा आक्षेप तंत्रज्ञानाऐवजी ते ज्यांच्या हातात आहे, त्यांच्यावर होते तर कधी तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविषयी होते. गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाने जी सांस्कृतिक उलथापालथ घडवून आणली, ती बऱ्याच वेळा चटकन दिसून येत नाही; पण घरात पाणी शिरले की त्रास होतो. सेलिब्रिटींची बात सोडा. त्यांच्या ट्विटची बातमी होते आणि काहीजणांना ट्विटचे पैसेही मिळतात अशी वंदता आहे. परंतु “मी ट्रोलिंग मस्तपैकी एन्जॉय करतोय,’ असं अगदी साधी-सुधी माणसं म्हणू लागलीत. काही वर्षांपूर्वी ज्यांना आईवडिलांनी दिलेल्या सूचनाही सहन होत नव्हत्या ते ट्रोलिंगचा “आनंद’ घेण्याइतपत “अभेद्य’ झालेत. यामुळे नकळत आपली कौटुंबिक आणि सामाजिक वीण उसवलीय; परंतु तो विस्तृत चर्चेचा विषय आहे. तूर्तास या माध्यमातून आपली फसवणूक होऊ शकते, हे तरी कळायला हवं. म्हणूनच ही नवमाध्यमं येऊन किती वर्षे झाली? असा प्रश्न विचारावासा वाटतो. अक्कल येण्यास एवढा कालावधी पुरेसा असावा. बाजाराभिमुख व्यवस्थेतल्या जाहिरातबाजीने आपल्या दबलेल्या भावभावना खेचून बाहेर काढल्या आणि सोशल मीडियातल्या (तथाकथित) गोपनीयतेने त्या अधिक धारदार केल्या. कोणीही आपल्याला “फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवावी आणि केवळ त्या व्यक्तीचा फोटो पाहून आपण आभासी दुनियेत भलत्या भराऱ्या मारायला लागावं, हे सुरुवातीच्या काळात ठीक होतं; परंतु इतक्या वर्षांनंतरही या मार्गाने कुणी आपल्याला हातोहात फसवत असेल, तर स्वतःलाच तपासलं पाहिजे. नागपुरात अशाच एका टोळक्याने अनेकांना गंडा घातलाय. सोशल मीडियावरून मैत्री करायची, ती वाढवायची, फोटो-व्हिडिओची देवाणघेवाण करायची आणि डाव साधायचा, अशी एकंदर कार्यपद्धती! सुमारे साठ जणांना ब्लॅकमेल केल्यानंतर या टोळीपासून सावध राहण्याविषयी नागपूर पोलिसांनी लोकांना बजावलंय. अर्थात, साठ हा अधिकृत तक्रारींचा आकडा आहे. प्रत्यक्षात असंख्य लोकांवर हा “प्रयोग’ झाला असण्याची आणि इभ्रत जाईल म्हणून हे लोक गप्प बसले असण्याची शक्यता पोलीस व्यक्त करतायत. संबंधित सुंदर तरुणी ज्याच्याशी मैत्री करेल, त्याच्याशी रात्रीच्या वेळी अश्लील व्हिडिओ चॅट करायची आणि त्याला ऑनलाइन निर्वस्त्र करायची. तो व्हिडिओ एकदा हाती लागला, की मग ब्लॅकमेलिंग सुरू! खरं तर थोडे तपशील वगळल्यास यात काहीही नवीन नाही. या फॉर्म्युल्यामुळे अनेकजण आयुष्यातून उठलेत. प्रश्न असा की, आभासी दुनियेत प्रत्यक्षात निर्वस्त्र होण्याची मानसिक तयारी होते कशी? आभासी जगाच्या पोटात शिरल्यावर त्याच्या मर्यादा आणि धोके लक्षात न येण्याइतपत आपण वाहवत का जातो? या टोळीच्या जाळ्यात तरुण विद्यार्थीच नव्हे तर डॉक्टर, इंजिनिअर, सीए एवढंच नव्हे तर पोलीससुद्धा या पिंजऱ्यात अडकलेत. सोशल मीडियाचा पूर्वानुभव पाहता आपल्याला कॅमेऱ्यासमोर निर्वस्त्र करण्यामागे डाव असू शकतो, अशी शंका येत नसेल, तर पूर्वानुभव फुटकच गेला म्हणायचा!