Satara | औंध पाणी योजनेबाबत आ. गोरे यांनी दिशाभूल करणे थांबवावे

वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील औंध परिसरातील 21 गावे पाण्यासाठी आसुसलेली असताना, आ. जयकुमार गोरे यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या गावांमधील लोकांची सुरू केलेली दिशाभूल थांबवावी.
त्याऐवजी कामाच्या निविदा आणि निधीबाबत बोलावे, अशी मागणी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने केली आहे.
औंध उपसा सिंचन योजनेत मूळ 16 गावे होती. त्यात समावेश होण्यासाठी भोसरे, लोणी, कोकराळे, धकटवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली येथील ग्रामस्थ अनेक वर्ष संघर्षे करत आहेत. या लोकांनी 9 जानेवारीला वडूजच्या तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला होता.
खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न आणि उरमोडीचे पाणी सोडण्यासाठी संघर्ष समितीने तहसील कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले होते.
त्यावेळु कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी समितीला दिलेल्या पत्रात औंधच्या योजनेत पाच गावांचा समावेश झाल्याचे म्हटले होते. त्या पत्रात भोसरे, लोणी, कोकराळे, धकटवाडी आणि सिद्धेश्वर कुरोलीतील ओलिताखाली येणार्या क्षेत्राचा उल्लेख केला होता.
मग, आता ही पाच गावे नव्याने समाविष्ट झाल्याच्या घोषणा करून आ. गारे हे दिशाभूल का करत आहेत. यातून ते काय साध्य करणार आहेत, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
औंध उपसा सिंचन योजनेतून ही पाच गावे वगळावीत, म्हणून पाणी प्रश्नाचे अभ्यासक दत्तात्रय जगदाळे यांनी औंधमध्ये आठ दिवस उपोषण केले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही पाच गावे औंध योजनेत यापूर्वीच समाविष्ट झाली होती.
मग, ही गावे नव्याने समाविष्ट झाल्याची वल्गना कशासाठी? विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असा इशारा समितीचे समन्वयक विजय शिंदे यांनी दिला आहे.
खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्याचे आपण सांगत आहात.
मात्र, ही बैठक एमआयडीसीच्या पाणीप्रश्नाबाबत आयोजित करण्यात आली होती, असे बैठकीचे इतिवृत्त सांगते. यामध्ये औंध उपसा सिंचन योजना आणि टेंभू योजनेबाबत चर्चा झाल्याचा उल्लेख आढळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत.
देवेंद्र फडणवीस हे जलसंपदा मंत्री, तर औंध परिसराच्या विकासासाठी धडपडणारे अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत. तुम्ही या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात. औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी सध्या आपल्या व्यासपीठावर आहेत. मग, औंध योजनेला निधी का मिळत नाही, या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
औंध योजनेच्या लाभक्षेत्रातील लोकांना निधीसाठी अजून किती आंबवणार आहात, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केला आहे.
पाणीप्रश्नावर लढण्याची एवढी धमक आणि औंध परिसरातील लोकांविषयी एवढा कळवळा असेल, तर औंध योजनेसाठी तातडीने निधी द्यावा आणि कार्यादेश आणावा, असे आव्हानही पवार यांनी दिले आहे.





