“स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभाग रचना रद्द करावी”; भाजपची मागणी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा धडाका लावला आहे. त्यातच आता आणखी एका निर्णयाची मागणी भाजपकडून जोर धरू लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.





