Abhishek Sharma golden duck record : विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला एका लाजिरवाण्या विक्रमाला सामोरे जावे लागले आहे. डावाच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाल्याने (गोल्डन डक) त्याने माजी कर्णधार विराट कोहलीच्या एका नकोशा विक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, एकाच मालिकेत दुसऱ्यांदा अभिषेकवर ही नामुष्की ओढावली आहे. संजूच्या मदतीला धावला आणि घात झाला! मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात संजू सॅमसन सातत्याने अपयशी ठरत होता. या दबावामुळे संजूने चौथ्या सामन्यात स्ट्राईक घेण्याऐवजी नॉन-स्ट्रायकर एंडला थांबण्याचा निर्णय घेतला. संजूचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अभिषेक शर्मा स्वतः स्ट्राईकवर गेला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला. संजूने आतापर्यंत २१ वेळा सलामी दिली असून १८ वेळा त्याने स्ट्राईक घेतले आहे, मात्र विशाखापट्टणममध्ये त्याने घेतलेला हा ‘बॅकफूट’चा निर्णय अभिषेकसाठी महागात पडला. विराट कोहलीच्या विक्रमाशी साधली बरोबरी – अभिषेक शर्माचा न्यूझीलंडविरुद्ध गोल्डन डक रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा ‘गोल्डन डक’ (पहिल्याच चेंडूवर बाद) होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता अभिषेक शर्माचे नाव समाविष्ट झाले आहे. तो विराट कोहलीसह आतापर्यंत २ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. इतर खेळाडूमध्ये संजू सॅमसन, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर हे प्रत्येकी ३ वेळा गोल्डन डकचे शिकार झाले आहेत. विशेष म्हणजे या नकोशा यादीत माजी कर्णधार रोहित शर्मा ५ वेळा पहिल्या चेंडूवर बाद होऊन अव्वल स्थानी आहे. हेही वाचा – IND vs PAK : १ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान आमनेसामने! सेमीफायनलचं तिकीट कोणाला मिळणार? पाहा संपूर्ण समीकरण दोनदा ‘झिरो’ तरीही धावांमध्ये आघाडीवर! अभिषेक शर्मासाठी ही मालिका संमिश्र ठरत आहे. एकाच मालिकेत दोनदा शून्यावर बाद होऊनही तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये आहे. अभिषेक शर्मा: १५२ धावा (तिसरे स्थान) सूर्यकुमार यादव: १७९ धावा (पहिले स्थान) ग्लेन फिलिप्स: १६९ धावा (दुसरे स्थान) आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांसाठीही महत्त्वाचा असणार आहे.