शिरूर : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथिल रहीवाशी व क्रीडा प्रबोधनी, बालेवाडी येथील होतकरू नेमबाज अभिषेक लहू कामठे याने महाराष्ट्र राज्य रायफल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गट खुल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत रौप्य पदक पटकावले असून महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात गौरवाची भर घातली आहे. भोपाळ (मध्यप्रदेश) येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील नामवंत नेमबाजांचा सहभाग होता. अशा कठीण व स्पर्धात्मक वातावरणात अभिषेकने १० मीटर एअर रायफल शूटिंग या प्रकारात अत्यंत अचूक, संयमी आणि सातत्यपूर्ण नेम साधत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला व उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत अभिषेकने आत्मविश्वासपूर्ण खेळ दाखवत अनुभवी खेळाडूंना मागे टाकले. अंतिम फेरीत थोडक्यात फरकाने सुवर्ण पदक हुकले असले तरी त्याची कामगिरी प्रेक्षक व परीक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या यशामागे क्रीडा प्रबोधनीचे प्रशिक्षक संदीप तरटे सर यांचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच वडील लहू कामठे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा मोलाचा ठरला. कठोर सराव, शिस्तबद्ध दिनचर्या व मानसिक स्थैर्य यांच्या जोरावर अभिषेकने हे यश संपादन केल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले. या यशाबद्दल क्रीडा प्रबोधनी, नेमबाजी संघटना, क्रीडाप्रेमी तसेच विविध सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिषेकचे अभिनंदन केले असून भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तो देशाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अभिषेक कामठेच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या नेमबाजी परंपरेला नवे बळ मिळाले असून ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंना तो प्रेरणादायी ठरत आहे.