Abhishek Ghosalkar case : राज्यात एकाच आठवड्यात दोन गोळीबाराच्या घटना घडल्या असून या घटनांमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. दरम्यान, दहीसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्यावर मॉरिस नरोन्हा याने गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत मोठी अपडेट हाती आली आहे. या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी मेहुल नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा गोळीबार झाला तेव्हा मेहुल हा मॉरिससोबत घटनस्थळी हजर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मेहुल नावाच्या व्यक्तीचा शोध सुरू होता. या शोधाचा अखेर शेवट काल रात्री उशीरा मेहुल पारेख याला ताब्यात घेऊन झाला. या गोळीबारापूर्वी जे फेसबूक लाइव्ह करण्यात आले होते, त्यावेळी मॉरिस यांनी स्वत:च मेहुल इज हिअर, असे जाहीर केले होते. त्यावेळी मोबाईलच्या मागे मेहुल नावाची व्यक्ती होती, हे स्पष्ट झाले होते.
गोळीबाराच्या या घटनेनंतर मेहुल पारेख घटनास्थळावरून फरार झाला होता. अखेर रात्री उशीरा त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र ते फेसबूक लाइव्ह सुरू असताना, घटनास्थळी मेहुल नेमका काय करत होता?, तो का आला होता? तसेच या सगळ्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी नेमके काय काय झाले, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिस मेहुलची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी मॉरिस नरोन्हाच्या कार्यालयात गुरुवारी रात्री ९ पासून ते शुक्रवारी पहाटे ४.३० पर्यंत पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी संपूर्ण पुराव्यांचे संकलन केले असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास ७.३० तास चाललेल्या या पंचनाम्यात पोलिसांना एक पिस्तूल, जिवंत काडतुस आणि सीसीटिव्ही फुटेज हस्तगत केले. तसेच या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने या प्रकरणाचा तपास बारकाईने केला जात आहे.
गोळीबाराची ही संपूर्ण घटना आरोपी मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयातच घडली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यालयातील तसेच बाहेरील सीसीटिव्हीच्या फुटेजचाही तपास सुरू केला आहे. तसेच येथे काही उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून मृत मॉरिस आणि मृत अभिषेक यांच्या संदर्भातील जबाब नोंदवण्यात आले.